महापालिका आयुक्त शेखर सिंह १८ दिवसांच्या सुट्टीवर
राहुल महिवाल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
![Municipal Commissioner Shekhar Singh on 18 days leave](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/shekhar-singh-1-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे तब्बल १८ दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. दि.११ जून ते २८ जून या कालावधीत त्यांनी अर्जित रजा घेतली आहे. त्यांच्या उपरोक्त कालावधीत श्री. राहुल महिवाल, भाप्रसे, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश महाराष्ट्र राज्याचे कार्यासन अधिकारी शिवाजी बा. चव्हाण यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दि.११ ते दि.२८ जूनपर्यंत रजा मागितली होती. त्यांच्या या अर्जित रजेस सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. शेखर सिंह यांच्या उपरोक्त रजा कालावधीचा आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. राहुल महिवाल, भाप्रसे, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. श्री. राहुल महिवाल, भाप्रसे, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांनी स्वतःकडील कार्यभार सांभाळून आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे या पदाचे कर्तव्य पार पडणार आहेत. शेखर सिंह हे रजेवरून परत आल्यावर राहुल महिवाल यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार आपोआप संपुष्टात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. तेव्हापासून प्रशासक महापालिकेचा कारभार पाहत आहेत. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे. अशातच नुकतीच लोकसभा निवडणुक देखील पार पडली, याकालावधीत सुरू असलेल्या आचारसंहितेचा फटका देखील कामांना बसला आहे. आता पावसाळ्यात आयुक्त तब्बल १८ दिवस सुट्टीवर गेल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.